दापोली : दापोलीत गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

तापमानातील या वाढीमुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ ते ३ या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.

हलका आहार घ्यावा आणि अति थंड किंवा अति गरम पदार्थ खाणे टाळावे. मानसिक तणावापासून दूर राहावे.

पाळीव प्राण्यांचीही विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गाई-म्हशी, कुत्रे-मांजर यांसारख्या प्राण्यांना थंड ठिकाणी ठेवावे.

गोठ्यात पंख्याची सोय करावी आणि त्यांच्या अंगावर नियमितपणे पाणी शिंपडावे. कुत्र्यांच्या आहारात ताकाचा समावेश करावा आणि त्यांना भरपूर पाणी द्यावे.

लहान झाडांना दररोज, तर मोठ्या झाडांना एक दिवसाआड पाणी द्यावे. सिंचनासाठी स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा, असेही कृषी विद्यापीठाने सांगितले आहे.

मागील वर्षी याच तारखेला कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस होते, असेही विद्यापीठाने नमूद केले आहे.

हवामानातील या बदलाचा विचार करून नागरिकांनी स्वतःची, प्राणी आणि पक्ष्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.