रत्नागिरी : जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कडक सूचना दिल्या होत्या.

या सूचनांचे पालन करत दापोली पोलिसांनी 07 जून 2025 रोजी विसापूर येथील समशेर अली नगर मोहल्ला येथे मोठी कारवाई केली.

दापोली पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, विसापूर येथील एका घरात गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी कोंडून ठेवल्याची खबर मिळाली.

या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांना अवगत केले.

त्यानंतर दापोली पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान, गोठ्यात जखडून बांधलेले 10 बैल, 15 गायी आणि 4 वासरे आढळून आली.

तसेच, हानीफ शेख अली मालवणकर याच्या घरालगतच्या जंगलयुक्त भागातही 3 गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी बांधलेली आढळली.

पोलिसांनी एकूण 29 गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत हलवले.

या प्रकरणी मुख्य आरोपी हानीफ शेख अली मालवणकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याच्यासह त्याचा मुलगा आणि भाऊ यांच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

यात पो.उ.नि. राजकुमार यादव, महेश पाटील, हेमराज निर्मळ, मिलिंद चव्हाण, पो.हवा. अभिजीत पवार, रूपा ढोले, साक्षी गुजर, पो.कॉ. विकास पवार, विजयंन सातारडेकर, सुरज मोरे, विशाल कदम, निलेश जाधव आणि अतुल सापते यांनी मोलाचा वाटा उचलला.