दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या कृपा शशांक घाग यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीत शिवसेना नेते आणि आमदार योगेश कदम यांचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आला. दापोली नगरपंचायतीच्या आवारात या विजयोत्सवासाठी प्रचंड गर्दी जमली होती, आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला.
शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घाग यांचे जोरदार अभिनंदन केले, तर भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दापोली नगरपंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून राजकीय घडामोडींनी जोर धरला होता. १४ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करत एकच गट स्थापन केल्यानं ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता.
या नगरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष खालीद अब्दुल्ला रखांगे, रविंद्र क्षिरसागर, अरीफ मेमन, नौशिन गिलगिले, शिवानी खानविलकर, अजीम चिपळूणकर, संतोष कलकुटके, महबुब तळघरकर, अश्विनी लांजेकर, कृपा घाग, अन्वर रखांगे, विलास शिगवण, रिया सावंत आणि प्रिती शिर्के आदींचा समावेश होता.
5 मे 2025 रोजी ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात शिंदे गटाच्या शिवसेनेने अविश्वास ठराव 16 विरुद्ध 1 ने मंजूर करून घेतला.
यानंतर आता कृपा शशांक घाग यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिंदे गटाच्या शिवसेनेने दापोलीत आपली पकड आणखी मजबूत केली आहे.
या निवडीपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी ठाकरे गटाला शह देण्यासाठी रणनीती आखली होती.
योगेश कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले, “दापोलीच्या जनतेने शिवसेनेवर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. येत्या काळात दापोलीचा विकास हा आमचा मुख्य अजेंडा असेल.”
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत यापूर्वी २०२२ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने १७ पैकी १४ जागा जिंकून सत्ता काबीज केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ८ आणि शिवसेनेने ६ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
मात्र, यंदाच्या घडामोडींमुळे शिंदे गटाने महाविकास आघाडीला मागे टाकत आपली ताकद दाखवली.
आपल्या निवडीनंतर कृपा घाग यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले,
कृपा घाग, नवनिर्वाचित नगराध्यक्ष
“दापोलीच्या जनतेने आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. माझ्या कार्यकाळात दापोलीच्या विकासाला प्राधान्य असेल. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि स्थानिक समस्यांवर तातडीने उपाययोजना केल्या जातील.”
घाग यांच्या नेतृत्वाखाली दापोलीत आता नव्या विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
या विजयोत्सवानंतर दापोली नगरपंचायतीच्या आवारात शिवसैनिकांचा जल्लोष पहायला मिळाला. स्थानिक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात घाग यांचे स्वागत केले.
भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीही या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत विकासाच्या दृष्टीने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
या निवडीमुळे कोकणातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलली असून, शिंदे गटाने दापोलीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
येत्या काळात घाग यांच्या नेतृत्वाखाली दापोली नगरपंचायत कोणत्या दिशेने प्रगती करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.