रत्नागिरी : मुश्ताक खान

दापोली नगरपंचायतीनं पिण्याच्या पाण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल संपूर्ण देशानं घेतली आहे. लोकसहभागातून काय क्रांती घडू शकते याचा अनुभव दापोलीकर घेत आहेत.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी तिसऱ्या #राष्ट्रीयजलपुरस्कार-२०२० ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये #रत्नागिरी (ratnagiri)  जिल्ह्यातील #दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. (Dapoli nagar panchayat grabs national water award)

आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.

दापोली नगरपंचायतला का मिळाला पुरस्कार?

दापोली नगरपंचायत हद्दीत एप्रिल महिना आला की, पाण्याची टंचाई सतत जाणवत होती. त्यात 2019 साली तर पाऊसही तुलनेनं कमी पडला होता.

मार्च महिन्यामध्ये नारगोली धरणाच्या पाहणीसाठी गेलेल्या मुख्याधिकारी महादेव रोगडे यांना पाण्याची स्थिती पाहून धक्काच बसला. टँकरने पुरवठा करायलाही यंदा पाणी शिल्लक राहणार नाही, याची त्यांना जाणीव झाली.

या वेळी चिंतेत असलेल्या रोडगे यांना त्यांच्या सोबत असलेले नगरपंचायतीचे कर्मचारी दीपक सावंत आणि स्वप्निल महाकाळ यांनी धरणामध्ये झरे आहेत असं महादेव रोडगे यांना सांगितलं. त्यांना या माहितीमुळे आशेचा किरण दिसला.

पण लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे शासकीय खर्चानं काहीही होऊ शकणार नाही, हे महादेव रोडगे यांच्या लक्षात आलं.

मग त्यांनी काँट्रॅक्टर, बिल्डर्स यांची छोटीशी मिटींग घेतली. सर्वांच्या सहकार्यानं नारगोली धरणा शेजारी एक खड्डा मारायचा, असं ठरलं. लगेचच कामाला सुरूवात झाली. खड्ड्याला झरे लागले आणि पाहता पाहता स्थिती बदलीली.

या खड्ड्यात जमा होणाऱ्या पाण्यामध्ये पंप लावले गेले आणि शहराची तहान भागवली जाऊ लागली. पण हा उपाय तातपुरता होता. कायम स्वरूपी तोडगा काढणं आवश्यक होतं.

या कामावरून आत्मविश्वास बळावला असल्यामुळं संपूर्ण धरणातील काळ उपसण्याची कल्पना महादेव रोडगे यांना सुचली.

सुरूवातील मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची स्थिती,

मै अकेला ही चला था, जानिबे मंज़िल मगर
लोग आते गए, कारवाँ बनता गया

अशी होती. मग त्यांना हळूहळू सर्वांची साथ लाभत गेली आणि या मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं. दापोलीतील अनेक लोकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या चळवळीला मदत केली.

जसजसा धरणातील गाळ उपसला जाऊ लागला, धरणातील झरे जीवंत होत गेले. ही मोहिम इतकी मोठी झाली, एवढी लोकं यामध्ये जोडली गेली की, या इथं सर्वांनी नावं लिहिणं निव्वळ अशक्य बनलं आहे.

पण काही प्रातिनिधिक नावं घेणं आवश्यक आहेत. तत्कालीन नगराध्यक्षा उल्का जाधव, परवीन शेख यांच्या कार्कीदीत ही मोहिम चालली. त्यावेळचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण दापोली चाललेली मोहिम काय हे खास पाहण्यासाठी आले.

विद्यमान आ. योगेश कदम, तत्कालीन नगराध्यक्षा उल्का जाधव

त्यांनीही माती उचलण्याचं काम केलं. लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, पत्रकार, नागरिक, विद्यार्थी या सर्वांनी आपला सहभाग नोंदवला. काहींही आर्थिक मदत केली तर काहींनी अंगमेहनत.

सर्वांच्या सहकार्यानं धरणातून गाळ उपसण्याचे काम जवळपास सत्तर दिवस चाललं. या 70 दिवसांमध्ये 55000 घनमीटर गाळ उपसला गेला.

डंपर, पोकलेन, जेसीबी दिवसरात्र या कामामध्ये जुंपली होती. या कष्टाचं खऱ्या अर्थानं चीज झालं. शहराला टँकर तर लागले नाहीच. शिवाय पाणी कपात करण्याची वेळही नगरपंचायतीवर आली नाही.

पहा व्हिडीओ : 25 वर्ष पाण्याची कमतरता भासणार नाही – महादेव रोडगे

नारगोली धरणामधील गाळ अत्यंत इमानदारीनं उपसला गेला आहे. शेकडो झरे जीवंत झाले आहेत. पाण्याचा मुबलक साठा धरणामध्ये होतो आहे. पुढच्या 25 वर्षांपर्यंत दापोली शहराला पाण्याची कमतरता भासणार नाही याचा मला विश्वास आहे. दापोली नगरपंचायतीला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचं किंवा फक्त दापोली नगरपंचायतीचं नाही तर संपूर्ण दापोलीकरांचं आहे.

महादेव रोडगे, तत्कालीन मुख्याधिकारी

राष्ट्रीय जल पुरस्कार का दिला जातो?

पाण्याच्या संवर्धनात आणि संरक्षणात जनजागृती होऊन या राष्ट्रीय कार्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून गैरसरकारी संस्था (स्वयंसेवी संस्था), ग्रामपंचायती, शहरी स्थानिक संस्था, जल वापरकर्ता संघटना, कॉर्पोरेट क्षेत्र, व्यक्ती, आदींसाठी केंद्र सरकारच्या जलसंपदा व नदी विकास मंत्रालयातर्फे ‘भूजल वाढ पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ काही वर्षांपासून सुरू करण्यात आले.

भूजल वाढीच्या नवीन पद्धतींचा अवलंब करणे, पाण्याच्या वापराची कार्यक्षमता वाढवणे, पाण्यावर पुनप्रूक्रिया व पुनर्वापर करणे आणि पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात लोकांच्या सहभागाद्वारे जनजागृती करणे या दृष्टीने विधायक कार्य करणाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. यामुळेच दापोलीतील लोकसहभागाच्या या मोहिमेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दापोली नगरपंचायतीला मिळू शकला.