प्रांतांच्या अध्यक्षतेखाली 5 मे रोजी विशेष सभेचा आयोजन

दापोली: दापोली नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेना गटाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या भवितव्याचा फैसला येत्या ५ मे २०२५ रोजी होणार आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) १४ नगरसेवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या गटाने मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडे दाखल केला आहे. नव्या कायद्यानुसार, नगराध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी नगरसेवकांना विशेष सभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

यासाठी प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ मे रोजी विशेष सभा आयोजित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या सभेत बहुमत तपासले जाईल आणि अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर होईल. दरम्यान हीच सभा दोन मे रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु ती पाच तारखेला का केली गेली याचं कारण मात्र दिलं गेलं नाही.

दापोली नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या ममता मोरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आता संकटात सापडली आहे.

तीन वर्षांपूर्वी, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते अनिल परब यांच्या पुढाकाराने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने ठाकरे गटाने दापोली नगरपंचायतीत सत्ता स्थापन केली होती.

तेव्हा मोरे नगराध्यक्ष, तर खालिद रखांगे उपनगराध्यक्ष झाले. मात्र, आता रखांगे यांच्यासह ठाकरे गटाचे सहा पैकी बहुतांश नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत, तर मोरे एकट्या पडल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कोकणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटाला धक्के देण्याची रणनीती अवलंबली आहे. दापोलीत हा दुसरा अंक असून, यामुळे ठाकरे गटाला कोकणातील आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाच्या युवा नगरसेविका शिवानी खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली १४ नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या गटात ठाकरे गट, शरद पवार गट आणि अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे.

अविश्वास ठराव यशस्वी झाल्यास शिंदे गटाकडून ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग किंवा शिवानी खानविलकर यांच्यापैकी एकाची नगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते, असा अंदाज आहे. तसेच, ज्येष्ठ कार्यकर्ते विलास शिगवण हे उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

दरम्यान, मार्च २०२५ च्या पहिल्या आठवड्यातच मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून यावर कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता.

मात्र, अलीकडेच सरकारने नगराध्यक्ष बदलण्याचा अधिकार नगरसेवकांना देऊन ‘जास्त बहुमत, तो नगराध्यक्ष’ असे धोरण लागू केले आहे. यामुळे शिंदे गटाने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

आता पाच तारखेला काय होणार याची उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये लागून राहिली आहे.

दापोली नगराध्यक्षा ममता मोरे अविश्वास ठरावाला सामोरे जाणार; नोटीस पद्धतीवर नाराजी

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नसून, ५ तारखेला होणाऱ्या विशेष सभेत ठरावाला तोंड देणार आहेत, असे त्यांनी ‘माय कोकण’शी बोलताना स्पष्ट केले. यापूर्वी त्यांना २ तारखेची नोटीस देण्यात आली होती, परंतु चार दिवस पूर्ण होत नसल्याने काल रात्री पुन्हा नोटीस देण्यात आली. रात्री १० नंतर ही नोटीस त्यांनी स्वीकारली. मात्र, नोटीस देण्याची पद्धत योग्य नसल्याची नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दापोली नगरपंचायतीत ममता मोरेंविरुद्ध अविश्वास ठराव: संख्याबळामुळे पद गमावण्याची शक्यता

दापोली: दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार असून, सध्याचे संख्याबळ पाहता त्यांचे पद गमावणे जवळपास निश्चित मानले जात आहे. दापोली नगरपंचायतीत एकूण १७ नगरसेवक असून, त्यापैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. एक नगरसेवक भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून आहे. म्हणजेच, महायुतीच्या गणितानुसार, १६ नगरसेवक ममता मोरे यांच्या विरोधात उभे राहू शकतात. यामुळे १६ विरुद्ध १ अशी लढत होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या परिस्थितीत ममता मोरे एकट्याच उरल्या असून, त्यांना पदावरून हटवणे सोपे मानले जात आहे. अविश्वास ठरावाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केवळ औपचारिक प्रशासकीय बाबी शिल्लक आहेत. येत्या ५ तारखेला होणाऱ्या विशेष सभेत याबाबत अधिकृतपणे स्पष्टता येईल.