रत्नागिरी : दापोलीच्या गौरी पटवर्धन हिनं अमेरिकेमध्ये फिजिक्स विषयामध्ये पीएचडी प्राप्त करून दापोलीचा झेंडा सातासमुद्रा पार पडकवला आहे. गौरी ही दापोलीतील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. नरेश पटवर्धन यांची मुलगी आहे.
गौरी पटवर्धननं दापोलीचं नाव उज्ज्वल करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तिनं यशाचा हा आलेख लहानपणापासूनच चढता ठेवला होता. चौथीत असताना तिनं स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्यानंतर सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत ती राज्यात द्वितीय आणि जिल्ह्यात प्रथम आली होती. महाराष्ट्र टॅलन्ट सर्च स्पर्धा असो किंवा नॅशनल टॅलन्ट सर्च स्पर्धा गौरीनं आपल्या कुशाग्र बुद्धीनं सर्वांचं लक्ष कायम वेधलं होतं.
दहावीत असताना ती बोर्डात ५वी आली होती. १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर तिनं आय.आय.टी. दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरींग फिजिक्समध्ये गैरीनं (9.75/10) GPA स्कोअरसह युनिव्हर्सिटीत द्वितीय क्रमांक पटकावत तिनं बी.टेक.ची पदवी प्राप्त केली.
भारतात पदवी प्राप्त केल्यानंतर गौरीनं पुढील शिक्षण अमेरिकेत घ्यायचं ठरवलं. अमेरिकेतील सुप्रसिद्ध कोरनेल युनिव्हर्सिटीत तिनं A+ ग्रेडसह मास्टर ऑफ सायन्स (MS) पूर्ण केलं. आता अप्लाईड फिजिक्स मधील नॉन लिनीअर ऑपटिक्समध्ये गौरीनं पीएचडी पूर्ण केली आहे. आता ती डॉ. गौरी नरेश पटवर्धन झाली आहे.
गौरीच्या आई वडिलांना तिच्या या यशाबद्दल प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत आहे. आमची मुलगी लहानपणा पासून कुशाग्र बुद्धीमत्ता असलेली होती. तिनं अभ्यासाच्या बाबतीत आम्हाला कधीच त्रास दिला नाही. मजलदर मजल करत तिनं शिक्षणामध्ये आपल्या कुटुंबियांचं नाव उज्ज्वलच केलं आहे. भविष्यात तिला भारतात काम करण्याची इच्छा आहे. तिच्या या एकूण प्रवासाबद्दल आमच्याकडूनही खूप खूप अभिनंदन!