दापोली : निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचा रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने निलीमाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नीलिमाचा घातपात नसून आत्महत्याच असल्याचं तपासात समोर आलं होतं.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाडला दापोली सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला असून त्याला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणातील तपास सुरूच असून निलीमाने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस तपास पोहोचला आहे. परंतु प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड यांनी कामा संदर्भात दबाव टाकून वारंवार तिचा मानसिक छळ केला असल्याचे तपासा दरम्यान उघड झाल्याने संग्राम गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे.

निलीमाचे वडील सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, आपली मुलगी दापोली इथल्या ज्या बँकेत काम करत होती त्या ठिकाणी दैनंदिन कामाची माहिती संग्राम गायकवाड याला द्यावी लागत असल्याचं सांगितलं आहे.

तिच्या कामात नेहेमी 15 दिवसांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार सुट्टीवर असताना ही फोन येत असत, असे सांगितले. दरम्यान या प्रकरणी निलीमाचा मृत्यू ही आत्महत्या होती, घातपात झाल्याचा कोणता पुरावा मिळाला नसल्याचं पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

तिच्या व्हीसेरा अहवालात देखील कोणत्याही प्रकारचं विष दिसून आलं नाही अस नमूद केलं आहे.