दापोलीतील गावतळे गावाजवळ जळालेली ‘मगर’ आढळली, वन विभागाने गुन्हा नोंदवला

दापोली : दापोलीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारील सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती तुषार महाडीक, सर्पमित्र (वाकवली, ता. दापोली) यांनी ९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता वन विभागाला भ्रमणध्वनीद्वारे कळवली. या माहितीनुसार, प्र. ग. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी (दापोली), वनरक्षक सुरज जगताप, शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव आणि विश्वंभर झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाहणी दरम्यान, कोरड्या विहिरीत मगर आढळली नाही. आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली असता, विहिरीपासून दक्षिण दिशेला ५० मीटर अंतरावर लाकडे पेटताना दिसली.

बारकाईने पाहणी केल्यावर आगीत मगर जळत असल्याचे आढळले. आग विझवून मगरीचा आगीत जळालेला आणि तोंडाचा शिल्लक भाग तपासासाठी ताब्यात घेण्यात आला.

शुभांगी रा. भिलारे, वनरक्षक (ताडील) यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवला. पुढील तपास सुरू आहे.

वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास किंवा अशा घटना घडल्यास नागरिकांनी वन विभागाचा टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ७४९९५७५७८९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पी. जी. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी (दापोली) यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*