खासदार सुनील तटकरेंचा दावा
कोल्हापूर : गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालक मंत्रीदेखील निवडले जातील. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालक मंत्रिपदाची जबाबदारी मिळेल, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केला.
“शरद पवार यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो आहोत, पण आम्हीदेखील पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. पक्षवाढीसाठी आमचादेखील खारीचा वाटा आहे. विद्यमान सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील आहे. मला दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची कीव येते. काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. उद्धव ठाकरेसुद्धा सभा घेत आहेत. अजित पवार यांना मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्याकडून आमच्यावर टीका होत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे,” असेही तटकरे यांनी अजित पवार यांनी कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या उत्तर सभेआधी सांगितले. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर आता लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे. दोन्ही गटाकडून म्हणणे सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे म्हणाले की, “निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे. जयंत पाटील यांनी आधीच विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईचे पत्र दिले आहे. या संदर्भात पुढील प्रक्रिया सुरू आहे. “
“महाविकास आघाडीमध्ये सामील होताना आम्ही शिवसेनेबरोबर गेलो. मग आता विचारसरणी बदलली असे होत नाही. आम्ही आमचा विचार बदलला नसून आमच्या विचारानेच पुढे चाललो आहोत. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी ते आमच्यात सामील होतील, अशी आजही अपेक्षा आहे. साहेबांना त्रास होऊ नये म्हणून बॅनरवर फोटो लावलेले नाहीत. ईडीला घाबरून आम्ही गेलो हा शरद पवार यांचा आरोप चुकीचा आहे,” असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याला प्रगतिपथावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभेच्या माध्यमातून आजच्या सभेच्या जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी दिशा दिली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी स्पष्ट केले.