रत्नागिरीतील कोविड रूग्णालयामध्ये 42 चिमुकल्यांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर दिलीप मोरे स्वतः कोरोनविरोधातील लढाईत हरले आहेत. गेल्या 13 दिवसांपासून ते रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र कोरोनामुळे गुरूवारी पहाटे अडीच वाजता त्यांची प्राण ज्योत मालवली. ते 64 वर्षांचे होते. या घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकांना धक्का बसला आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ.दिलीप मोरे गोररीबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जायचे. जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतरही रुग्णांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून ते सेवा बजावत होते. त्याचबरोबर रत्नागिरीतील एस. टी. स्टँड परिसरात ते दवाखाना चालवत होते.
रत्नागिरीत जन्मलेल्या चार दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती. 6 महिन्याच्या बाळालाही कोरोना झाला होता. वय 60च्या वर असूनही ते रूग्णालयात येत होते. त्यांनी या मुलांवर उपचार करून त्यांना बरं केलं.
डॉ. मोरे यांच्या जाण्यानं रत्नागिरीला धक्का बसला आहे, अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.