दापोली : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दापोली शहरात रविवारी भव्य महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीरित्या पार पडले.

सकाळी ८.३० वाजता केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या अभियानाची सुरुवात झाली.

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे, स्वच्छता समितीच्या सभापती जया साळवी, पाणीपुरवठा समितीच्या सभापती प्रीती शिर्के आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या अभियानामध्ये दापोली एस.टी. स्टँड ते बुरोंडी नाका, केळसकर नाका ते आंबा संशोधन केंद्र, तहसील कार्यालय, पंचायत समिती परिसर आणि शहरातील सर्व रस्ते चकाचक करण्यात आले.

सुमारे ५४० जणांनी या कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. या अभियानादरम्यान सुमारे १५ टन ओला आणि सुका कचरा जमा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आला. यासाठी १८ वाहनांची मदत घेण्यात आली.

श्रीबैठक जालगाव, साखळोली आणि दाभोळ येथील श्रीसदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे महास्वच्छता अभियान यशस्वी झाले.

दापोली शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.