दापोलीच्या पाजपंढरीत निवडणूक वादातून राडा, सहा जणांवर गुन्हा दाखल

दापोली: तालुक्यातील पाजपंढरी येथे विधानसभा निवडणुकीतील वाद चव्हाट्यावर आल्याने दोन गटांमध्ये तुंबळ राडा झाला.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश जनार्दन चोगले, अनिल गोपाळ चोगले, जितेंद्र सखाराम चोगले, विष्णू बाळ्या तबीब, वामन चाया चोगले आणि किसन जनार्दन चोगले (सर्व रा. पाजपंढरी शेतवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाजपंढरी शेतवाडी मंडळाचे अध्यक्ष गणेश जनार्दन चोगले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी वाडीतील सदस्यांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत गणेश चोगले यांनी उपस्थितांना विशिष्ट पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी नीलकंठ हिऱ्या रघुवीर यांनी दुसऱ्या व्यक्तीला मतदान करणार असल्याचे सांगितले. तक्रारीनुसार, त्यावेळी कोणीही त्यांना विरोध केला नव्हता.

मात्र, ८ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता चंद्रकांत रामा रघुवीर यांच्या घरासमोर शेतवाडी मंडळाची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत गणेश चोगले यांनी पुन्हा निवडणुकीतील मतदानावर चर्चा सुरू केली.

मतदानाच्या आकडेवारीवरून बाचाबाची झाली आणि गणेश चोगले यांनी नीलकंठ रघुवीर यांच्या शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

नीलकंठ रघुवीर यांचे भाऊ त्यांना वाचवण्यासाठी धावून आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच, ‘तुम्ही गावात राहायचे नाही, ऐकले नाही तर ठार मारून समुद्रात फेकून देऊ’ अशी धमकी दिल्याचा आरोप नीलकंठ रघुवीर यांनी तक्रारीत केला आहे.

या तक्रारीच्या आधारावर दापोली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या उपनिरीक्षक डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*