चिपळूण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

चिपळूण:- तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने आपल्या चुलत भावाच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांवरील सुमारे ७०० हापूस आंबे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

२४ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास ही चोरी झाली. मात्र, याप्रकरणी १० मे रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मनोहर तुकाराम साबळे (वय ५६, सध्या रा. मुंबई) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही त्यांची चुलत बहीण आहे.

त्यांच्या मालकीच्या रावणीचे टेप येथील आंब्याच्या झाडांवर तयार झालेले सुमारे ७०० हापूस आंबे, ज्यांची किंमत १० हजार ५०० रुपये आहे, ते आरोपी महिलेने फिर्यादीला न विचारता आणि त्याच्या संमतीशिवाय चोरून नेले.

याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.