चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी गुरुवारी रात्री ८.३० वाजता मोठी कारवाई करत १६ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. कापसाळ येथे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी बोलेरो पिकअप गाडी ताब्यात घेतली असून, त्यातून गुटखा वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

चिपळूण शहरात गेल्या काही दिवसांपासून गुटख्याची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. शहरातील टपरींवर सर्रास गुटखा विकला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही चिपळूणवासीयांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पोलिसांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिपळूणच्या दिशेने गुटख्याची वाहतूक करणारी गाडी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी कापसाळ येथे सापळा रचला आणि संशयास्पद बोलेरो पिकअप गाडी थांबवून तपासणी केली. तपासणीत गाडीत गुटखा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गाडी आणि १६ लाख ९४ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याशिवाय, ७ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी जप्त करून एकूण २३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी पोलिसांनी गाडीचा चालक सज्जन रामचंद्र नेवगी (वय ३५, रा. इंसुली, सावंतवाडी) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आणि पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलिस हवालदार वृषाल शेटकर, संदीप मानके आणि पोलिस नाईक रोशन पवार यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी आता या गुटखा प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. हा गुटखा नेमका कोणत्या व्यावसायिकाला पुरवला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहे, याचा शोध घेतला जात आहे.