चिपळूण: चिपळूण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवे आणि आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
डोंगररांगांपासून ते सपाट मैदानांपर्यंत आगीचे प्रमाण वाढले आहे.
यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे, तसेच आंबा, काजूच्या बागाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.
या ताज्या घटना असतानाच, सोमवारी दुपारी चिपळूण-गुहागर बायपास मार्गावरील भानुशाली यांच्या बारदान गोदामाला भीषण आग लागली.
आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. ही आग विझवण्यासाठी चिपळूण नगर परिषद आणि लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत गोदामातील बारदान पूर्णपणे जळून खाक झाले होते.
या आगीत भानुशाली यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या भागात वारंवार लागणाऱ्या आगींमुळे स्थानिक नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.
प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.