दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव समारंभपूर्वक साजरा झाला.

इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.

या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरीत विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी सहभागी झाले.

कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. या समारंभासाठी व्यासपीठावर सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव, सचिव प्रविण मुलूख, कला क्रीडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद मुलूख, सचिव स्वरुप मुलूख, ग्रामपंचायत सदस्य गौरी मुलूख, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, ग्रामविकास अधिकारी संदीप सकपाळ, शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, आशाबाई मुळे, अंगणवाडी सेविका सृष्टी पागडे, विद्या शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश आणि गोड खाऊचे वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख सुनील कारखेले, सरपंच भाग्यश्री जगदाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश बैकर आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्रीधर जाधव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत आणि रेखा ढमके यांनी केले.