मुंबई – कोरोना संकट कायम असल्याने १९ फेब्रुवारी रोजी तारखेनुसार साजरी होणारी शिवजयंती यंदा साधेपणाने साजरी करा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

यंदा शिवजयंतीला मिरवणुका तसेच बाईक रॅली काढता येणार नसल्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत.

शिवजयंती दिनी शिवनेरी, रायगड तसेच अन्य किल्ल्यांवर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा शिवजयंती गड किल्ल्यावर साजरी न करता ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवावेळी १० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.

सदर कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असं गृह विभागाने म्हटले आहे.

कोरोना संकटामुळे दिवाळी, ईद, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले होते. शिवजयंतीही साध्या पद्धतीनं साजरी व्हावी असं आवाहन सरकारनं केलं आहे.