खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका तरुणासह दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

या टोळीने इर्टिगा गाड्या भाड्याने देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली.

त्यांनी नवीन गाड्या खरेदी करण्यास प्रवृत्त करून त्या गाड्या परस्पर डेमो कार म्हणून विकल्या.

या टोळीने रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गाड्यांची विक्री केली.

पोलिसांनी आतापर्यंत 1 कोटी 63 लाख रुपयांच्या 16 इर्टिगा गाड्या जप्त केल्या आहेत.

आरोपींनी ‘पॅलेस कार रेन्टल’ नावाची कंपनी सुरू केली आणि लोकांना त्यांच्या गाड्या भाड्याने देण्याचे आकर्षक पॅकेज दिले.

गाडी मालकांना दर महिन्याला भाड्याचे पैसे नियमितपणे दिले, ज्यामुळे पहिल्या काही महिन्यांत मालकांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर, त्यांनी गाड्या परस्पर विकण्यास सुरुवात केली. या गाड्या सातारा, सांगली, कराड, गेवराई, जालना, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये डेमो कार म्हणून विकल्या.

सातारा येथील प्रथमेश नलावडे यांनी त्यांची इर्टिगा कार 26 ऑगस्ट 2024 रोजी खराडी येथील सिटीव्हीस्टा बिल्डींगमध्ये आरोपींनी सुरू केलेल्या पॅलेस कार रेन्टलमध्ये दरमहा 45 हजार रुपये भाड्याने दिली होती.

काही दिवसांनंतर, नलावडे यांना त्यांची कार पाथरी परभणी येथील अशोक कुरढाने यांना विकल्याचे समजले. त्यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केला असता, पॅलेस कार रेन्टलचे कार्यालय बंद असल्याचे आणि सर्व आरोपी फरार झाल्याचे आढळून आले.

तपासात, या टोळीने अशाच प्रकारे 16 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले. कुंदन यादव (वय 23, रा. वडगाव बुद्रुक, नवले पुलाजवळ, मूळ खेड, रत्नागिरी) आणि गिरीष सणस उर्फ संदीप उर्फ सौरभ सुनील काकडे (येरवडा) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी कुंदन यादव याला खराडी येथील स्वीट इंडिया चौकातून अटक केली आणि गिरीष काकडे याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 16 इर्टिगा गाड्या जप्त केल्या. यामध्ये जीपीएसच्या मदतीने गाड्या शोधून काढल्या.

या तपासामध्ये अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळपे, संतोष म्हत्रे, अंमलदार सुरेंद्र साबळे, नवनाथ वाळके, अमोल भिसे, अमित जाधव, सचिन पाटील, प्रफुल मोरे, मुकेश पानपाटील, श्रीकांत कोद्रे, प्रवीण गव्हाणे यांनी सहभाग घेतला.