दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव ब्रम्हणवाडी येथे एक धक्कादायक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे.

दिनांक २३ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून ते ४ जून २०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजेपर्यंतच्या कालावधीत हा गुन्हा घडला.

फिर्यादी मकंद सिताराम तांबे (वय ६४ वर्षे, व्यवसाय-चिरेखाण, राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जालगाव, दापोली यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर ५३/५ येथील चिरेखाणीच्या मीटर रूमवर अज्ञात चोरट्याने हल्ला चढवला.

या चोरट्याने कटावणी किंवा तत्सम तीक्ष्ण हत्याराने मीटर रूमच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

या घरफोडीत चोरट्याने चिरेखाणीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सुमारे ₹३७,००० किंमतीच्या मौल्यवान साहित्याची चोरी केली.

यामध्ये ₹१५,००० किंमतीचे पिवळ्या रंगाचे लोखंडी कटर शाफ्ट, ₹१५,००० किंमतीच्या चिरेकटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन गोलाकार दाते असणाऱ्या ब्लेड, ₹५,००० किंमतीचे ट्रॅक्टरच्या चाकांना लावण्यात येणारे चार वेट, ₹१,००० किंमतीचा लोखंडी पार्ट्याचा टूल बॉक्स आणि ₹१,००० किंमतीच्या लहान-मोठ्या चार लोखंडी कटावण्या यांचा समावेश आहे. या चोरीमुळे फिर्यादीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच फिर्यादी मकंद तांबे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून दिनांक ५ जून २०२५ रोजी रात्री १०:५९ वाजता गुन्हा क्रमांक १०६/२०२५ नोंदवण्यात आला.

हा गुन्हा भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. सध्या दापोली पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून तपास तीव्र करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.