रत्नागिरी : शहर परिसरात ब्राउन हेरोईन या अंमली पदार्थाच्या पुड्या बाळगणाऱ्या तीन संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयितांना ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
रऊफ इक्बाल डोंगरकर (३५, रा. उर्दु स्कूलजवळ, कर्ला, रत्नागिरी), नझीर अहमद मोहम्मद वस्ता (३८, रा. वस्ता मोहल्ला, राजीवडा, रत्नागिरी), राहील अजीज सुवर्णदुर्गकर (२९, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ६) ला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हयामध्ये घरफोड्या व चोऱ्या यांना प्रतिबंध, तसेच अवैद्य व्यवसायांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलींग करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिलेल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करुन त्याच्या मार्फत महत्वाच्या ठिकाणी पेट्रोलींग सुरु होती.
गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर परिसरात पेट्रोलींग करत असताना संशयित एकता नगर- रत्नागिरी परिसरात संशयितरित्या फिरत असताना आढळले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासात त्यांच्याकडे ४०५ ब्राउन हेरोईन या अंमली पदार्थाच्या पुडया व इतर साहीत्य असा एकूण १ लाख ४५ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला.
पोलिसांनी तो जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध एनडीपीएस ॲक्स कलम ८(क), २१ (ब), २९ अन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे, विजय आंबेकर, दिवराज पाटील, विवेक रसाळ यांनी केली.