रत्नागिरी – कोरोना आहे म्हणून यंत्रखरेदी केली जात आहे. कोरोना जाईल तेव्हा या सगळ्याचा भांडाफोड करणार, असा इशारा भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला. तसेच रुग्णांना वेळेवर वैद्यकीय बिले रुग्णालयांकडून मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नेमके बिल कसे आकारले जाते, याचे ऑडिट झाले पाहिजे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.
खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय बिलांबाबत नातेवाइक तक्रारी करत आहेत. त्यासंदर्भात ऑडिट झाले पाहिजे. शासनाने दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे हे बिल असले पाहिजे. या दरामध्ये दिलेल्या सुविधांचे जादा पैसे रुग्णालये घेत असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. याबाबत लक्ष घालण्याची मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे यांनी दापोली ते राजापूरचा एकत्र दौरा करावा, अशी आग्रही मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली.
सत्ताधारी नेते मंत्री, फक्त रत्नागिरीत येतात, जातात. रुग्णालयांवर कारवाईचे आदेश हवेत विरले. महिला रुग्णालयाचे काम प्रलंबित आहे. ही सर्व धूळफेक करण्याचे काम सुरू आहे. फक्त दौरे करायचे, तळागाळातील लोक काय बोलतात याचाही विचार मंत्र्यांनी करावा, असा टोला भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी हाणला.
प्रशासनाला चूक दाखवली की मंत्री सांगतात, कोरोनाकाळ आहे, राजकारण नको. अनिल परब हे आंबा व्यावसायिकांवर कारवाई करायला पुढे पण, केतन मंगल कार्यालयात झालेल्या अनधिकृत लसीकरणावर गुन्हा दाखल होण्यासाठी त्यांनी काय केले? ओसवाल नगर सेक्स प्रकरण अनिल परब यांना माहिती नाही. इतका महत्त्वाचा विषय प्रशासन सांगायला विसरले की सोयीस्कर कानाडोळा केला जातो, अशी टीकाही पटवर्धन यांनी केली.
काही गावातील खासगी डॉक्टर कोव्हिड लक्षणे असणार्या रुग्णांवर उपचार करत आहेत. ते जादा प्रमाणात औषधाची मात्रा देतात. परंतु रुग्ण गंभीर झाल्यावर त्याला शासकीय रुग्णालयात आणले जाते व दोन-तीन दिवसांत रुग्ण दगावतो. अशा घटना घडत असून त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी कोव्हिड उपचार करणार्या शासकीय रुग्णालयांची नावे प्रसिद्ध करावीत, अशी मागणी केली पटवर्धन यांनी केली आहे.
कोव्हिडसंदर्भात त्यांनी सांगितले, आम्ही रुग्णांच्या मदतीसाठी काम करत आहोत. प्रशासनाला आमचे सहकार्य आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या त्यांच्या बाथरूमध्ये गुडघाभर पाणी आहे, स्वच्छता नाही. लोक घाबरूनच दगावत आहेत. सोयीसुविधा, व्यवस्था नीट नाही तर त्याचे ऑडिट झाले पाहिजे.
काही गोष्टींचे खुलासे होण्याची गरज आहे. सध्या रेमेडिसिव्हिर इंजेक्शनलाही जिल्हाधिकारी परवानगी देत असल्याने शासकीय दराने ते इंजेक्शन मिळावे, परंतु काही खासगी रुग्णालये जादा दराने विक्री करत आहेत. त्यामुळे दररोजच्या कोव्हिड आकड्यांप्रमाणे प्रत्येक रुग्णालयाची मागणी किती असा चार्टही प्रसिद्ध करावा.