रत्नागिरी : रत्नागिरीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) उबाठा शिवसेनेला मोठा धक्का देत नाचणे जिल्हा परिषद गटातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे.
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि आश्वासक कार्यशैलीमुळे प्रभावित होऊन उबाठा शिवसेनेच्या अनेक शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
या प्रवेशाने नाचणे गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे, जो एकेकाळी उबाठा सेनेचा बालेकिल्ला मानला जायचा.
भाजपाचे जिल्हा पदाधिकारी संदीप सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी नाचणे जिल्हा परिषद गटातील शिवानी रेमुळकर (ग्रामपंचायत सदस्य), विशाल औधकर (शाखाप्रमुख, वॉर्ड क्र. ३), सुमित पारकर (शाखाप्रमुख, वॉर्ड क्र. ४), देवराज सुर्वे (उपविभाग प्रमुख, युवासेना), अश्विनी शेलार (महिला आघाडी, शाखा संघटक, वॉर्ड क्र. ५), प्रमिला ठिक (महिला आघाडी, उपविभाग संघटक, माजी ग्रामपंचायत सदस्य), मंजिरी चव्हाण (महिला आघाडी, उपशाखा संघटक), सुमन घाणेकर (गटप्रमुख), श्रेया धनोकर (गटप्रमुख) यांच्यासह किरण हातखंबकर, अनघा मोरे, माधुरी तिवारी, संध्या चवंडे, पूजा ठिक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
या प्रसंगी नितेश राणे यांनी नव्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, दादा दळी, विवेक सुर्वे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे रत्नागिरीतील भाजपाची ताकद आणखी वाढली असून स्थानिक राजकारणात नवे वारे वाहण्याची शक्यता आहे.