रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सावंत यांनी राजीनामा सुपूर्द केला. चव्हाण हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
राजीनाम्यामागील कारण : कन्या विरुद्ध महायुती उमेदवार
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हेच राजीनाम्यामागील प्रमुख कारण आहे.
सावंत यांची कन्या शिवानी माने या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
विशेष बाब म्हणजे, शिवानी माने या उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेते बाळ माने यांच्या सून आहेत.
जिल्हाध्यक्षपदावर असताना सावंत यांना महायुतीच्या नगराध्यक्ष उमेदवाराचा प्रचार करावा लागला असता.
यामुळे थेट स्वतःच्या कन्येच्या विरोधात प्रचार करण्याची वेळ आली असती.
हे कौटुंबिक व राजकीय संघर्ष टाळण्यासाठी सावंत यांनी पदाचा त्याग केल्याचे बोलले जात आहे.
पुढे काय? सावंत कुणाचा प्रचार करणार?
राजीनामा दिल्यानंतर सावंत भाजपमध्ये राहून नेमका कुणाचा प्रचार करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे पक्षनिष्ठेची ओळख, तर दुसरीकडे कन्येची निवडणूक – हा निर्णय रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणाला नवं वळण देणारा ठरू शकतो.

