मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री वांद्रे येथील त्यांच्याच ऑफिससमोर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणात पोलिसांनी तीनपैकी दोन आरोपींना अटक केली तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. त्यासंबंधीत एक भलीमोठा पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली याचं कारण सांगणारी एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. तसेच, या हत्येसाठी अभिनेता सलमान खान हा जबाबदार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगने म्हटलं की, “ओम जय श्री राम, जय भारत, मला जीवनाचं सार समजतं आणि संपत्ती आणि शरीराला मी धूळ समजतो. मैत्रीच्या कर्तव्याचा सन्मान करत मी जे योग्य होतं तेच केले. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं.
पण तुझ्यामुळे आमच्या भावाला जीव गमवावा लागला. आज बाबा सिद्दीकी यांचा शालीनपणाचा सागर संपला आहे किंवा एकेकाळी त्याच्यावर दाऊदसोबत मकोका होता. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे त्याचे दाऊद आणि अनुज थापन यांच्यासोबत बॉलिवूड, राजकारण आणि मालमत्ता व्यवहाराशी असलेले संबंध. आमचं कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र, सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करणारा जो कोणी असेल त्याने तयार राहावे. जर कोणी आमच्या भावांना मारले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. आम्ही कधीच पहिला वार करत नाही. जय श्री राम, जय भारत, शहीदांना विनम्र अभिवादन.