आज दुपारी भाऊ मेहता यांच्या निधनाची मनाला चटका लावणारी बातमी कानावर पडली आणि भुतकाळाच्या आठवणीत मन रममाण झालं. भाऊ म्हणजे कायम हसतमुख आणि प्रेमळ व्यक्तीमत्व. सर्व वयोगटातील व्यक्तींशी त्यांची मैत्री होती. प्रत्येकाची आस्थेनं चौकशी करणारे भाऊ आज आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाहीये.

माझी त्यांची ओळख फार जुनी नसली तरी गेल्या १७ वर्षांपासूनची आहे. भाऊंची आणि माझी औपचारीक ओळख २००३ साली झाली. त्यापूर्वी फक्त मी त्यांना ओळखत होतो पण ते नाही. दापोलीतील एक बडी आसामी अशी त्यांची ख्याती होती. माणसं जिकती मोठी असतात तेवढी ती विनम्र असतात असं पुस्तकात वाचलं होतं. पण भाऊंना भेटल्यावर ही गोष्ट किती खरी आहे हे मनापासून पटलं.

माझी त्यांची पहिली भेट त्यांच्या घरा शेजारील एस.टी.डी. बुथमध्ये झाली. भाऊंसोबतच्या अनेक गोड आठवणी त्यांच्या एस.टी.डी.वरच्या आहेत. मी पत्रकारितेत नवा नवा होतो. माझं वय जेमतेम २२ वर्ष असेल. आम्ही त्यांच्या एस.टी.डी.त बातम्या फॅक्स करण्यासाठी जात असू. त्यांचा लोभस आणि तेजस्वी चेहरा समोरच्या व्यक्तीवर वेगळी छाप पाडत असे. माझ्यावरही ती पडली. त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ठ्य म्हणजे वयानं कितीही कमी असाल, तरी ते कोणाला अरे तुरे करत नसत. आमच्या ओळखीच्या १७ वर्षांच्या कालावधीत त्यांनी कधीही मला अरे तुरे केल्याचं आठवत नाही. आताच्या काळात कोणी अजातशत्रू असू शकतो का? असा प्रश्न मला कायम पडत असे. पण भाऊंना पहिल्यावर मला खात्री पटली की, अजातशत्रू माणसं असू शकतात.

मी रत्नागिरीत स्थायिक झाल्यामुळे अलीकडे भाऊंशी माझी फार भेट होत नव्हती. त्यांचा मुलगा प्रसाद माझा मित्र असल्यानं आणि मी दापोलीत आल्यावर आम्ही मॉर्निंग वॉकला जात असल्यामुळे सकाळी त्यांच्या घराच्या इथं भाऊंची भेट होत असे. कसं चाललं आहे? पत्रकारिता कशी सुरू आहे? सुरूवातीचे दिवस आठवतात का? असे प्रश्न भाऊ विचारत. आता असे प्रश्न विचारण्यासाठी ते नाहीयेत याची मला जाणीव होत असताना अतीव दु:ख होत आहे.

या दु:खद प्रसंगी प्रसाद आणि मेहता कुटुंबियांना परमेश्वर दु:ख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना करून भाऊंना माझ्या कुटुंबियांच्या आणि मित्र परिवाराच्यावतीनं श्रद्धांजली अर्पण करतो.

मुश्ताक खान

संपादक

माय कोकण