रत्नागिरीचे सुपुत्र व विधानसभेचे माजी प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये यांचे आज दुपारी मुंबई येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

भास्कर शेट्ये यांचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर त्यांनी कायद्याची परीक्षा देऊन वकिलीची पदवी घेतली. काही काळ वकिली केल्यानंतर त्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी सांगली, पुणे, नाशिक, राधानगरी, कोल्हापूर, धुळे, चाळीसगांव, पालघर, पणजी आदी ठिकाणी न्यायाधीश म्हणून अनेक वर्षे काम केले होते. त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांची महाराष्ट्र विधानसभेचे प्रधान सचिव म्हणून निवड झाली. विधानसभा सचिव म्हणून त्यांनी दहा वर्षे कामकाज पाहिले.

विधानसभा सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नव्यानेच निर्माण झालेल्या महाराष्ट्र-गोव्याचे बँकींग लोकपाल म्हणून निवड झाली. बँकींग लोकपाल म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. निवृत्ती नंतर त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून ते अनेक वर्षे काम करीत होते.

न्यायप्रिय व शिस्तप्रिय म्हणून ते प्रसिद्ध होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांना जवळून सहवास लाभला होता. त्यांना विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले होते. मुंबईतील प्रसिद्ध लाड फाऊंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
गेले काही महिने ते मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते. तेथेच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचेमागे त्यांची पत्नी शामल, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मुंबई हायकोर्टाचे ऍड. सचिंद्र शेट्ये तसेच त्यांचे धाकटे चिरंजीव तारांगण क्षेत्रात काम करणारे अभिजित शेट्ये, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.