चिपळूण : आगामी काळ निवडणुकीचा असल्यामुळे आमदार शेखर निकम राष्ट्रवादीची संघटना बांधणीसाठी कामाला लागले आहेत. आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण मधील शिवसेनेची सूत्रे हाती घेऊन तेही संघटना बांधणीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे भविष्यात चिपळूणचे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

पुढील निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार शेखर निकम पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत त्यांचा २९ हजार मतांनी विजयी झाला.

२०२४ ची निवडणूक राज्यातील प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले किंवा युती आणि आघाडीच्या – माध्यमातून लढले तरी शेखर निकम हेच पुन्हा एकदा बाजी मारतील असे चित्र होते.

परंतु राष्ट्रवादी उभी फुट पडली. आमदार शेखर निकम यांनी मतदार संघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ धरली. माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अडचणीच्या काळात साथ देण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला साथ दिल्यानंतर भाजप विरोधी मते आपल्यापासून लांब जाऊ नये यासाठी शेखर निकम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

मतदार संघातील अल्पसंख्यांक, मागासवर्गीय आणि इतर समाजातील मतदारांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठी आमदार निकम यांचे प्रयत्न सुरू आहेत. ते पक्ष बांधणीसाठी वाडी वस्तीवर फिरत आहेत. मुंबई पुण्यातील चाकरमान्यांचे मेळावे घेत आहेत.

मागील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु ते चिपळूणमध्ये सक्रिय नव्हते. शिवसेना फुटल्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद मोठी आहे. नेतृत्व नसल्यामुळे शिवसेनेचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार भास्कर जाधव स्वतः चिपळूणमध्ये सक्रिय झाले.

शेखर निकम, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर मी सर्व प्रकारचे भेद विसरून केवळ मतदार संघाचा विकास एवढेच डोक्यात ठेवून काम करत आलो आहे आणि यापुढेही तेच करणार आहे. राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

भास्कर जायव, आमदार शिवसेना (UBT)

चिपळूणशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मी गुहागर मध्ये गेलो आणि निवडून आलो. पण चिपळूणशी कधी संबंध तोडले नाही. चिपळूणमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. इथली संघटना उभी करताना आम्ही सुरुवातीला फार मोठे कष्ट घेतले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी मी चिपळूणमध्ये सक्रिय झालो आहे.