मिऱ्या, रत्नागिरी: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून गेली सहा वर्षे मिऱ्या किनाऱ्यावर लाटांचा मारा खात अडकून पडलेल्या ‘बसरा स्टार’ जहाजाचे अखेर दोन तुकडे झाले आहेत.
सातत्याने धडकणाऱ्या अजस्त्र लाटांमुळे जहाजाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले, ज्यामुळे हे जहाज पूर्णपणे भंगारात गेले आहे.

सोशल मीडियावरील रिल्समुळे प्रसिद्धी मिळालेल्या या जहाजाने येथील पर्यटनाला चालना दिली होती, परंतु आता त्याच्या अवशेषांमुळे मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.
मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावर टेकलेल्या या जहाजाला काढण्यासाठी मेरिटाईम बोर्डामार्फत जहाजाच्या मालकाला प्रशासनाने मुदत दिली होती.

मात्र, ती मुदत संपून गेल्यानंतरही जहाज काढण्यासाठी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, प्रशासनाने या भंगारात गेलेल्या जहाजाची मोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिऱ्या बंधाऱ्याच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतच्या १२०० मीटरच्या टप्प्याचे काम शिल्लक असून, या जहाजामुळे या कामाला व्यत्यय येत आहे.
पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार, मिऱ्या किनाऱ्यावरील सात डेंजर झोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे.

मात्र, पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा अद्याप प्रलंबित आहे, आणि याला कारण आहे अडकलेले बसरा स्टार जहाज. गेल्या अनेक महिन्यांपासून हे जहाज पर्यटनाचे केंद्र बनले होते.
सोशल मीडियावरील रिल्समुळे हे जहाज पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येत होते, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या होत्या.
पण आता खवळलेल्या समुद्राच्या अजस्त्र लाटांनी जहाजाला मध्यभागी फोडले असून, त्याचे दोन तुकडे झाले आहेत.

या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि पत्तन विभागापुढे जहाजाच्या अवशेषांचा प्रश्न उभा राहिला आहे.
जहाजाच्या मोडणीबरोबरच बंधाऱ्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.