बांग्लादेशी नागरिकाला आश्रय दिल्याप्रकरणी चिपळूणमधून एकाला अटक

चिपळूण: खेड:- तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लू मुल्ला (वय ३२, सध्या रा. खेर्डी-चिपळूण, मूळगाव पाटेश्वरी-बांग्लादेश) याला चिपळूण पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, २७ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी, १२ मार्च रोजी अकबर अबू शेख (सध्या रा. कळंबणी, मूळगाव पडोली-बांग्लादेश) याला पोलिसांनी अटक केली होती.

या बांग्लादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या चिपळूण येथील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता.

अखेर, पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जॉनी मुल्ला या दुसऱ्या संशयिताला जेरबंद केले.

अटकेतील संशयित गेल्या १८ वर्षांपासून खेर्डी-चिपळूण येथे वास्तव्यास होता आणि ठेकेदार म्हणून काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनी मुल्ला हा गेल्या १८ वर्षांपासून चिपळूण परिसरात बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता.

त्याने अकबर शेख याला इमारत बांधकामावर काम करण्यासाठी येथे आणले होते.

कळंबणी येथील बांधकामावर काम करत असताना अकबर शेख याला दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली होती.

त्यानंतर त्याला आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लाच्या मागावर पोलिस होते.

संशयिताने आणखी काही बांग्लादेशी नागरिकांना येथे आणले होते का, याचा तपास सध्या सुरू आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संशयितांच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी केली जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*