दापोली : तालुक्यातील हर्णे येथील मच्छीवार बांधव शेवंडाच्या पिल्लांना समुद्रात सोडून जीवदान देण्याचे काम काही महिन्यांपासून करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचं संपूर्ण तालुक्यामधून कौतुक होत आहे.
हर्णे हे दापोली तालुक्यामधील मच्छीमारीसाठी अतिशय प्रसिद्ध गाव. हर्णे बंदर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचं मोठं बंदर मानलं जातं.

या गावात कोळी समाजाची वस्ती असून येथील बंदरावर भरणारा मासळी बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. इथल्या बंदरावर मासळी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि पर्यटक हजेरी लावतात.
येथील मच्छिमार गेल्या काही दिवसांपासून (डिसेंबर २०२४) छोटे शेवंड (Lobster) अंदाजे ३०० ग्रॅम असलेले समुद्रात सोडले जात आहेत.
आकाराने लहान असलेल्या शेवंडाच्या पिल्लांना बाजारात भाव मिळत नाही आणि भविष्यात शाश्वत मच्छीमारी व्हावी यासाठी मच्छीमार छोटे पिल्लांना समुद्रात सोडून जीवनदान देत आहेत.

या कृत्यामुळे भविष्यामध्ये मच्छीमारांचा फायदा होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शेवंडाचा आकार वाढल्याने बाजारात त्याला चांगला भाव मिळतो.
यामुळे शेवंडाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्याचे कार्य मच्छीमार बांधव चांगल्याप्रकारे करतांना दिसून येत आहेत. आज पर्यंत समुद्रात सोडलेल्यांचा छोट्या शेवंड पिल्लांचा आकडा २०० पेक्षा जास्त पोहचलेला आहे.
नेटफिश-एमपीडा ही संस्था मच्छीमारांमध्ये शाश्वत मच्छीमारी कशाप्रकारे करावी यासाठी वेळो-वेळी जनजागृतीचे कार्यक्रम करत असते.

बारिक मासे पकडू नका, बोटीवरील खलाशी लोकांनी स्वच्छता कशी बाळगावी, माशांची कशा प्रकारे हाताळणी करवी, प्री-कुलींग कसे करावे, अशा प्रकारे अनेक कार्यक्रम घेऊन मच्छीमारांना जागृत करण्याचं काम केलं ही संस्था करत आहे.
(HDC) गोपीचंद चोगले व महाराष्ट्राचे समन्वयक (SCO) संतोष कदम हे हर्णे बंदरामध्ये नेटफिश-एमपीडाच्या वतीने जन-जागृतीचे कार्य करत आहेत.
याचाच परिणाम म्हणून हर्णे येथील मच्छीमार बांधवांनी शेवंडाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्याचं काम सुरू केलं आहे, अशी माहिती मिलिंद मधुकर चोगले यांनी दिली आहे.