मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवेशाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली असून, पात्रतेतील टक्केवारीची अट शिथिल करण्यात आली आहे.
नर्सिंग स्कूल्स अँड कॉलेजेस मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष रामलिंग माळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुक्त अनिल भंडारी यांच्याकडे ही मागणी केली होती. भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या 17 सप्टेंबरच्या पत्रानुसार पात्रता शिथिलतेची मंजुरी मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवेश प्रक्रिया आणि वेळापत्रक
- नोंदणी प्रक्रिया: 23 ते 28 सप्टेंबर (ऑनलाइन अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक)
- नोंदणीकृत उमेदवार आणि मेरिट लिस्ट जाहीर: 29 सप्टेंबर
- सीट मॅट्रिक्स जाहीर: 29 सप्टेंबर
- प्राधान्यक्रम फॉर्म भरणे: 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर
- निवड यादी जाहीर: 4 ऑक्टोबर
- प्रत्यक्ष हजेरी आणि प्रवेश प्रक्रिया (मूळ कागदपत्रांसह): 5 ते 10 ऑक्टोबर
सीईटी सेलच्या माहितीनुसार, कॅप-4 नंतरही जागा रिक्त राहिल्यास पुढील फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा
सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांना वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग आणि सीईटी सेल यांच्या वतीने प्रवेश मार्गदर्शन आणि नोंदणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सर्व उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.