रत्नागिरी : कोविड १९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एस. के. फुले, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूर विभागाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे प्रामुख्याने उपस्थित होते.


माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्यावतीने हे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्हयात १६ व्हॅन्स द्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलपथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड लसिकरण मोहिम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये १० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लसिकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे.

लसिकरणाविषयी असलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेला जागृत करणे, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती फिरत्या बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना करून देण्यात येणार आहे.

यावेळी कलापथकातील कलाकारांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे सादरीकरण करून लोकांपर्यंत जनजागृती संदेश पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनजागृती मोहिमेसाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांचे सहकार्य लाभले आहे.

या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक संतोष अजमेरा यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, कोल्हापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, क्षेत्रीय प्रचार सहायक प्रमोद खंडागळे, एन.डी. नाळे, विलास शेणवी, कलापथकाचे शिवा संभा कलापथकाचे अवधुत पवार व त्यांच्या चमूचे सदस्य परिश्रम घेत आहेत.