रत्नागिरी दि. 30: खेड, चिपळूण, राजापूर येथील पूरपरिस्थीतीमुळे बंद अवस्थेत असलेले एटीएम आणि बँक शाखा पुढाकार घेऊन तात्काळ सुरु करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी सभागृह येथे बँकर्स जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एन.डी.पाटील तसेच जिल्हयातील विविध बँकाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. जिल्हाधिकारी म्हणाले या पुरामुळे बाधित झालेल्यांना शासनाकडून येणारी मदत ही लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यासाठी येथील बंद असलेले एटीएम आणि बँक शाखा तात्काळ सुरु करा. येथील नागरिकांकडे बँक व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रेही नसल्याने पंचनाम्यानुसार बाधित असल्यांची यादी बँकाना देण्यात येईल. यादीनुसार ज्या व्यक्तींची बँक डिटेल नाहीत त्याची आयएफएससी कोड, खाते क्रमांक, आधार क्रमांक, पॅन क्रमांक आदि माहिती तात्काळ सादर करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ज्या बाधितांचे पंचनामे झालेले आहेत त्यांनी आपल्या संबधित बँकेत जाऊन आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँक कोड इतर माहिती घेऊन संबधित पंचनामे करणारे पथकाला अथवा तहसिलदारांना उपलब्ध करु द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. पूरग्रस्तभागातील छोटे उद्योगधंदे असणाऱ्यांना कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे नव्याने कर्ज देण्यासाठी सहकार्य करावे. कमीत कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधून सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. यासाठी आवश्यक ती मदत आपल्याला केली जाईल असेही ते म्हणाले. व्यापाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी रु.10 लाख पर्यंतच्या कर्जाला हमी मागू नये. बाधितांनी घेतलेल्या कर्जासाठी चे हप्ते भरण्यासाठीची ठराविक कालावधी वाढवून द्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. रेशनकार्ड,आधारकार्ड इतर सेतूमधून देण्यात येणाऱ्या सुविधा विनामूल्य देण्याबाबत शासनास पत्राद्वारे विनंती केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.