नाशिक: आविष्कार शिक्षणसंस्थेचे संस्थापक विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते साथी अरुण ठाकूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा पाचवा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार चिपळूण येथील श्रमिक सहयोग संस्थेला प्रदान करण्यात आला.

या संस्थेने दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या धनगर आणि कातकरी समाजाच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

शनिवार, २२ मार्च रोजी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणतज्ज्ञ नीलेश निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

आनंद निकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘इसलिये राह संघर्ष की हम चुनें’ हे प्रेरणादायी गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

आविष्कार शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मुकुंद कोकीळ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर सचिव विनोदिनी काळगी यांनी प्रास्ताविक केले. साथी अरुण ठाकूर यांच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली.

श्रमिक सहयोग संस्थेचे समन्वयक राजन इंदुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना २० हजार रुपये रोख, ५ हजार रुपयांची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर राजन इंदुलकर यांनी कातकरी आदिवासींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली.

आशिमा मित्तल यांनी श्रमिक सहयोग आणि आनंद निकेतनच्या कार्याचे कौतुक केले.

नीलेश निमकर यांनी आदिवासींच्या जगण्याच्या पद्धतीला शिक्षणात आणण्याच्या श्रमिक सहयोग संस्थेच्या प्रयत्नांचे महत्त्व सांगितले.

या कार्यक्रमाला नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.