नाशिक: आविष्कार शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ यावर्षी कोळकेवाडी येथील श्रमिक सहयोग संस्थेला जाहीर केला आहे.

संस्थेच्या सचिव विनोदिनी काळगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.

आविष्कार शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वस्त अरुण ठाकूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. अरुण ठाकूर यांनी तरुणपणापासून अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

राजकीय आणि सामाजिक प्रश्नांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. संस्थेची वैचारिक आणि शैक्षणिक भूमिका त्यांच्या विचारातूनच साकारली आहे. २०१९ मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले.

शिक्षण क्षेत्रात प्रयोगशील काम करणाऱ्या, विशेषतः दुर्बल आणि वंचित गटातील मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्था किंवा शिक्षकांना दरवर्षी त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत चार पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

यावर्षीचा पाचवा पुरस्कार श्रमिक सहयोग संस्थेला देण्याचे संस्थेने निश्चित केले आहे. या पुरस्काराचे वितरण नीलेश निमकर यांच्या हस्ते होणार आहे.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी २१ मार्च २०२५ रोजी नाशिकला पोहोचावे, जेणेकरून त्यांना शाळेला भेट देऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाता येईल, असे आवाहन संस्थेने केले आहे.

पुरस्काराच्या स्वरूपात मानपत्र आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. तसेच, श्रमिक सहयोग संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारे एक छोटेखानी प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

राजन इंदुलकर म्हणतात,

“तुम्हांला कळविण्यास आनंद होत आहे की, नाशिक येथिल आविष्कार शिक्षण संस्थेने अरुण ठाकूर यांच्या स्मृतींप्रित्यर्थ पुरस्कार देऊन श्रमिक सहयोगच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्याचे ठरविले आहे. आपले काम समजून घेण्यासाठी विनोदिनी काळगी, दिपा पळशीकर, माधव पळशीकर यांनी कालच प्रयोगभूमीला भेट दिली होती. दिवसभर थांबून शिक्षक, मुले यांच्यासोबत संवाद साधला. या पुरस्काराने आपणा सर्वांचा उत्साह निश्चितच द्विगुणित होणार आहे.”