रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याच्या पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ब्राउन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक 7 एप्रिल 2025 रोजी रत्नागिरी शहरात गस्त घालत होते.

याच दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नाचणे रोड ते गुरुमळी मार्गावर एका संशयित व्यक्तीची हालचाल पोलिसांना दिसून आली.

आरोपी अदनान नाजीममियाँ नाखवा, वय २५ वर्षे, रा. १५७, ब, जुना फणसोप, ता. जि. रत्नागिरी हा दुचाकी वाहनावर बसलेला होता.

पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि पंचांसमोर त्याच्याकडील पिशवी तपासली. तपासणीत ब्राउन हेरॉईन या अमली पदार्थाच्या एकूण १५४ पुड्या आणि इतर साहित्य आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ अदनान नाखवाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३३/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अदनान नाजीममियाँ नाखवा याच्याकडून ब्राउन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थाच्या १५४ पुड्या आणि एक दुचाकी वाहन असा एकूण २,०५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करत आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी आणि अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस हवालदार शांताराम झोरे, पोलीस हवालदार नितीन डोमणे, पोलीस हवालदार बाळू पालकर आणि पोलीस हवालदार गणेश सावंत यांनी केली आहे.