मंडणगड येथील मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपायाला लाचलुचपत विभागाने पकडले

मंडणगड : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रत्नागिरी युनिटने मंडणगड येथे मोठी कारवाई करत मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे आणि शिपाई मारुती भोसले यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ मे २०२५ रोजी करण्यात आली. या प्रकरणात तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मंडणगड तालुक्यातील शेणाळे येथे लिलावात शेतजमीन खरेदी केली होती.

या जमिनीची फेरफार नोंद करून सातबारा उतारा मिळवण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून काम करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

यासाठी शिपाई मारुती भोसले यांनी तक्रारदारांकडे ५०,०००/- रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ४५,०००/- रुपये ऑनलाइन स्वरूपात आधीच स्वीकारले गेले होते.

मात्र, पूर्ण रक्कम न मिळाल्याने मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी फेरफार नोंद रद्द केली.

तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर २७ मे २०२५ रोजी सापळा रचून पडताळणी दरम्यान मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी तक्रारदारांकडून ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली.

ही रक्कम पंचांसमोर स्वीकारल्यानंतर त्यातील १५,५००/- रुपये स्वतःसाठी ठेवून उर्वरित १४,५००/- रुपये तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना देण्यात आले. यानंतर लाचलुचपत विभागाने तिन्ही आरोपींना पंचांसमोर ताब्यात घेतले.

या कारवाईचे मार्गदर्शन ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर आणि सुहास शिंदे तसेच रत्नागिरी घटकाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास खालील संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवावी:

  • टोल फ्री क्रमांक: १०६४
  • टेलिफोन: ०२३५२/२२२८९३, मोबाइल: ७५८८९४१२४७, ९८७०४७४५३५
  • ई-मेल: acbratnagiri@gmail.com
  • वेबसाइट: www.acbmaharastra.gov.in, www.acbmaharastra.net
  • फेसबुक पेज: www.facebook.com/MaharastraACB

या कारवाईमुळे मंडणगड परिसरात भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईचा संदेश गेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*