व्हीडीएस परीक्षेत आंजर्ले नं.१ शाळेचे सुयश

दापोली- दापोली पंचायत समितीचा शैक्षणिक उपक्रम असलेल्या व्हीजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आंजर्ले नं.१ने घवघवीत यश संपादन केले असून या शाळेचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची पुर्वतयारी म्हणून दापोली पंचायत समितीच्या वतीने दरवर्षी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांसाठी ‘व्हीडीएस’ परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

इयत्ता चौथीतील सर्व विद्यार्थी या परीक्षेस बसतात. नुकत्याच पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल आता जाहीर करण्यात आला असून जिल्हा परिषद मराठी शाळेतील वरदा संदिप देशपांडे या विद्यार्थीनीने या परीक्षेत दापोली तालुक्यातून पाचवा क्रमांक पटकावला आहे.

याशिवाय याच शाळेतील रुद्रदत्त रामेश्वर परांजपे या विद्यार्थ्यांने तालुक्यातून ४२ वा क्रमांक पटकावून गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. व्हीडीएस परीक्षेत बसलेले या शाळेचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

व्हीडीएस परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका कविता मयेकर तसेच वर्गशिक्षिका शितल विटेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. पंचायत समिती दापोली येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, गटशिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे, व्हिजन दापोलीचे सुनील कारखेले आदी मान्यवरांच्या हस्ते वरदा संदिप देशपांडे हिचा गुणगौरव करण्यात आला.

आंजर्ले नं.१ शाळेतील विद्यार्थ्यांनी व्हीडीएस परीक्षेत प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाबद्दल आंजर्ले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, आंजर्ले प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, केंद्रप्रमुख सुदेश पालशेतकर, तसेच सर्व पालक व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*