रत्नागिरी: शासनाकडील दि.24 डिसेंबर 2021 च्या आदेशास अनुसरुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि.25 डिसेंबर 2021 चे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादूर्भाव यामध्ये वाढ झालेली असून ओमिक्रॉन विषाणुमुळे अधिक धोका निर्माण झालेला आहे. या कारणास्तव शासनाने दि. 24 डिसेंबर 2021 च्या आदेशामध्ये अंशत: बदल करुन सुधारीत निर्बंध लावले आहेत.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी डॉ. बी. एन.पाटील हे साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कोव्हीड-19 विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडील 24 डिसेंबर 2021 च्या आदेशास अनुसरुन रत्नागिरी जिल्हयात खालीलप्रमाणे अतिरिक्त निबंध लागू करीत आहे.
1) विवाह समारंभ बंद जागेमध्ये किंवा मोकळया जागेमध्ये आयोजित करतेवेळी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित राहील.
2) कोणताही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक मेळावा किंवा कार्यक्रम बंद जागेमध्ये किंवा मोकळया जागेमध्ये आयोजित करतेवेळी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित राहील.
3) अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची कमाल संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित राहील.
4) या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त यापूर्वी कोरोना विषाणू संदर्भातील सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले करोना निर्बंध आदेश / मार्गदर्शक सूचना व निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड
संहितेचे कलम 188 नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.
हा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्हयाच्या क्षेत्रासाठी लागू राहील (प्रतिबंधित क्षेत्र वगळून),असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.