मंडणगड : म्हाप्रळ-आंबेत पुलाचे काम अंतीम टप्यात आलेले असताना ३१ ऑगस्ट २०२३ सायंकाळी आठ वाजण्याचे दरम्यान जुन्या कॉलमचा कठडा कोसळल्याने त्यांचे आधारावर उभे करण्यात आलेल्या नवीन स्लाबचे गर्डर करिता लावण्यात आलेले सेंटरीग कोसळून सावित्री नदीच्या पात्रात पडले.

त्यामुळे गणेशोत्सवाची आधी पुलाचे काम पुर्ण होवून तो वाहतूकीसाठी खुला होण्याच्या सर्व शक्यता मावळल्याने मंडणगड तालुक्यातील नागरीकांची नाराजी विविध माध्यमातून व्यक्त होवू लागली आहे.

म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला आहे. मंडणगड, दापोली तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीत महत्वाची भूमिका आहे बंद पुलामुळे दापोली, मंडणगड तालुक्यातील सर्वात मोठ्या रहदारीचे भविष्यच एका अर्थाने अंधकारात सापडले आहे.

व्यापार, दळणवळण, पर्यटन या क्षेत्राना फटका बसून मंडणगड तालुक्यातीचे अर्थकारण डळमळीत झाले. त्यामुळे विकास प्रक्रियेला ब्रेक मिळाला आहे.

धीम्या गतीने काम

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यंमत्री बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांनी दुरदृष्टीने दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्रीनदीवर उभ्या केलेल्या या अत्यंत महत्वाकांक्षी पुलामुळे मंडणगड व दापोली हे दोन तालुके मुंबई व पुणे या महानगरांना जवळच्या रस्ते मार्गाने जोडले गेले, पुलामुळे मंडणगड, दापोली तालुक्याच्या विकासाची प्रक्रीया खऱ्या अर्थाने गतीमान झाली; पण त्या पुलाची साधी डागडुजी करणेही सत्ताधाऱ्यांना शक्य होत नसल्याचे गेल्या चार वर्षात वेळोवेळी सिध्द झाले. पुलाअभावी हे दोन्ही तालुके विकासाचे आघाडीवर दहा वर्षे मागे सरकले आहे.

गर्डरसाठी बांधण्यात आलेल्या सेंटरिंगचे काम करताना घडली घटना; परिसरात खळबळ

जुन्या पिलरला पर्याय म्हणून बाजूने आठ नवीन पाईल उभे करण्यात आले होते. त्यावर पाईल कँप टाकल्यानंतर गर्डरचे काम सुरु असताना गर्डरसाठी बांधण्यात आलेले सेटंरीग, काम सुरु असताना कोसळले.

गुरुवारी सायकांळचे सुमारास अचानक घडलेल्या नवीन घटना क्रमामुळे नियोजीत वेळेत काम पुर्ण होणे जवळ जवळ अशक्य झाले आहे. जुन्या पिलरचे काही भागाचे कोसळण्याचे आवाजामुळे परिसरात एकच घबराट उडाली होती.

या विषयी समाज माध्यमात उलट सुलट चर्चा सुरु असल्याने वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

गेल्या पाच वर्षांपासून रडतखडत दुरूस्ती

अधीक्षक अभियंता संकल्प चित्र मंडळ यांनी सन २०१९ मध्ये आंबेत पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले त्यानुसार त्यांनी पुलावरून सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्याचे सूचित केले.

यानंतरच्या कालवधीत पुलाच्या दुरुस्तीच्या कारणाने पुलावरून होणारी वाहतूक वारंवार बंद करण्यात आली. त्याचदरम्यान पुल कमकुवत असून या पुलाच्या पेडस्टल दुरुस्ती व बेअरिंग बदण्याच्या कामासाठी १२ मार्च २०२० मध्ये पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला.

काम पूर्ण झाल्यांनतर सन २०२१ मध्ये आंबेत पुल खुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर सहाच महिन्यांच्या कालावधी सन २०२२ मध्ये आंबेत पासून दुसऱ्या क्रमांकाच्या पिलर्सचे दुरुस्तीच्या करणाने पुलावरून पुन्हा एकदा सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली.

आंबेत पुलाच्या दूरूस्तीच्या कालावधीतला आढावा घेतल्यास मागील सुमारे चार ते पाच वर्ष प्रशासन आंबेत पुल दुरुस्त करत आहे.