दापोली न. पं.च्या उपनगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांचा वेगळा गट

माय कोकणची बातमी ठरली खरी

दापोली : दापोलीतील राजकारणामध्ये मोठी आणि खासदार सुनील तटकरे यांना धक्का देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवक वेगळे झाले आहेत. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी या गटाला मान्यता दिली आहे आणि उपनगराध्यक्ष खालीद रखांगे या गटाचे प्रमुख म्हणून निवडले गेले आहेत.

Exclusive

माय कोकणची बातमी खरी ठरली खरी

दापोली मध्ये लवकरच भूकंप घडणार अशी माहिती कालच माय कोकणने दिली होती. आमची बातमी ही तंतोतंत खरी ठरली आहे. सात नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी आपला वेगळा गट स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या नगरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष खालीद अब्दुल्ला रखांगे, महबूब कमरुद्दीन तळघरकर, संतोष दत्ताराम कलकुटके, अन्वर अ. गफुर रखांगे, विलास राजाराम शिगवण, अश्विनी अमोल लांजेकर आणि रिया रूपेश  सावंत यांचा समावेश आहे‌.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आठ नगरसेवक निवडून आले होते. जेव्हा अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झाले तेव्हा हे आठही नगरसेवक राष्ट्रवादीमध्येच थांबले होते. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कामही केलं होतं. पण आता आठ पैकी सात जण वेगळे झाले आहेत. आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहिल्या आहेत. त्यांचाही प्रवेश या गटासोबत होणार आहे का याचे उत्तर सध्यातरी नाही आहे. अर्थात या विषयावर त्यांची प्रतिक्रिया आम्हाला अद्यापही समजू शकली नाहीये.

दापोली नगरपंचायतीच्या या नव्या गटाचे गटप्रमुख म्हणून खालीद रखांगे यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्यांनी असा नवा गट स्थापन केल्याचं मान्य केलं आहे. मात्र या गटाबाबत त्यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. लवकरच आम्ही पुढची दिशा ठरवू आणि तुम्हाला योग्य ती माहिती कळवू असं त्यांनी म्हटल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते नाराज होते का? काय असं घडलं की त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे? तुम्ही खासदार सुनील तटकरे यांची साथ का सोडलीत? या प्रश्नांची उत्तरं मात्र त्यांनी दिलेली नाहीयेत. त्याचं म्हणणं एकच आहे की, लवकरच आम्ही याबद्दल तुम्हाला सविस्तरपणे माहिती देणार आहोत.

शिवसेना दापोली तालुकाप्रमुख म्हणतात मला काही याबद्दल काही माहीतच नाही?

दापोली नगरपंचायती नगरसेवकांनी अशा प्रकारचा कोणताही गट स्थापन केला असल्याबाबतची कल्पना आपल्याला नाही, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी माय कोकणला दिली आहे. मी त्या सगळ्या नगरसेवकांशी चर्चा करणार आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आणण्याचे प्रयत्न करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. ही गोष्ट खरच तुम्हाला माहित नाही, असं त्यांना विचारल्यावर त्यांनी म्हटलं, 100% यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाहीये. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू आणि योग्य तो निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटल आहे. ते नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये येणार आहेत याची चर्चा सगळ्यांना आहे आणि तुम्हाला ही गोष्ट माहित नाही असं कसं हे विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं की, आम्ही यापूर्वी एकत्र लढलेलो आहोत. तुमच्या माध्यमातून आम्हालाही माहिती मिळते आहे आम्ही सगळ्यांशी चर्चा करून यावर नक्कीच लवकरच निर्णय जाहीर करू, असं ऋषिकेश गुजर बोलले.

हे सातही नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार?

हे जातही नगरसेवक ज्यांनी आता वेगळा गट स्थापन केला आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार आहेत अशी माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे. तू या विषयावर सध्या तरी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. याबद्दलच्या प्रश्नावर त्यांचं उत्तर आहे लवकरच आम्ही एकत्र बसून यावर चर्चा करू कार्यकर्त्यांशी बोलू आणि मग आपला निर्णय जाहीर करू असं सांगत आहेत.

राजकारण वेगळ्या दिशेने सुरू?

दापोली मधील राजकारणाला एक वेगळीच दिशा आता मिळायला लागली आहे. ज्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केला आहे ते आता वेगळे होत आहेत. याचा अर्थ इतरही अनेक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की काय सुरू आहे हे सध्या तरी आकलनापलीकडे आहे. बऱ्याच घडामोडी या मतदारसंघांमध्ये भविष्यात घडू शकतात अशीच चिन्ह यानिमित्ताने दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कार्यकर्ते का बाहेर पडत आहेत!

सात नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून बाहेर पडलेले आहेत. ते आता पुढची दिशा काय ठरवतात हे लवकरच स्पष्ट होईलच. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून ही लोकं का बाहेर पडत आहेत याचं आत्मपरीक्षण सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करावा लागणार आहे. अजित पवार गटाकडून डॅमेज कंट्रोल केला जाणार आहे का? असे प्रश्नही सध्या विचारले जात आहेत.