दापोली : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोलीच्या मुख्यालयाच्या परिसरामध्ये विविध ठिकाणी त्याचबरोबर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व घटक महाविद्यालये, सर्व संशोधन केंद्रे आणि कृषि विज्ञान केंद्रे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रातिनिधीक स्वरुपात उद्यानविद्या विभागाच्या गोवा माणकुर बागेमध्ये विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्याहस्ते सोनपरी या आंब्याच्या जातीच्या कलमांचे वृक्षारोपण करण्यात आले.

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आंब्याच्या विविध जातींची जवळजवळ २००० कलमांची लागवड करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव तथा उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर आणि उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्व. डॉ. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस कुलगुरु महोदय आणि सर्व संचालक तसेच विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पांजली अर्पण करुन आदरांजली वाहून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी विस्तार शिक्षण संचालनालयामध्ये नव्यानेच उभारण्यात आलेल्या प्रसार मंथिनी परिषद दालनाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्याहस्ते आणि विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक निर्बाण, डॉ. प्रमोद सावंत आणि माहिती तंत्रज्ञान केंद्राचे माजी व्यवस्थापक डॉ. दिपक हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

उद्‌घाटनाच्या प्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर यांनी परिषद दालनाच्या उभारणीमागची संकल्पना विस्तृतपणे मांडली. यावेळी कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या विद्यापीठाचे युट्युब चॅनलचे उद्घाटन करुन या युट्युब चॅनलच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन शेतकरी आणि कृषी आधारित उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या युट्युब चॅनलचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच आपल्या संबधित मित्रमंडळींपर्यंत सदरच्या माहितीची देवाण घेवाण करावी असे आवाहन केले.

यावेळी या कार्यक्रमाला विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठ अभियंता निनाद कुलकर्णी, नियंत्रक अपर्णा जोईस, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत शहारे आणि सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले