पिंपरी -राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे पिंपरी-चिंचवड शहर दत्तक घेणार आहेत. पिंपरी-चिंचवडचा मुंबईच्या धर्तीवर विकास करण्यासाठी आदित्य ठाकरे हे शहर दत्तक घेणार असल्याचा दावा शिवसेनेचे संपर्क नेते सचिन आहिर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना आहिर यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराचा मुंबईच्या धर्तीवर विकास करण्यासाठी हे शहर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दत्तक घेणार आहेत. त्या दृष्टीने शिवसेनेने नियोजन करून तयारी करून ठेवली आहे.
महापालिका भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, गटनेते राहुल कलाटे, माजी आमदार ऍड, गौतम चाबुकस्वार, योगेश बाबर, उर्मिला काळभोर, नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी आहिर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. त्या संदर्भात राज्य सरकारच्या नगरसचिव खात्याने महापालिकेकडून अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर नक्की कारवाई होईल. खासदार संजय राऊत यांनी स्मार्ट सिटीबाबत तक्रार केली आहे. मात्र, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे या प्रश्नासाठी वेळ नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. या संदर्भात नगरसचिव खात्याने महापालिकेकडे अहवाल मागितला आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.