पासिंगची मुदत संपली; सेवाभावी संस्थेकडून वाहने जमा

खेड : कोरोना काळात नगरपरिषद रुग्णालयातील सेवेसाठी दिलेल्या ६० लाख किंमतीच्या रुग्णवाहिका वर्षभरापासून ऊन पावसात धुळखात पडून असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

कोरोनाच्या काळात उद्योजक कौस्तुभ बुटाला यांनी बंधन बॅंकेमार्फत ४० लाखांची अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट मिळवून दिली होती.

रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांनी २० लाख किंमतीची रुग्णवाहिका सेवेत दाखल केली होती.

दोन्ही रुग्णवाहिका सेवेसाठी राॅयल ॲम्ब्युलन्स सर्व्हिस व मुस्लिम वेल्फेअर संस्थेकडे तीन वर्षे करारानुसार दिली होती.

रुग्णवाहिकेच्या पासिंंग बरोबर इतर कागदपत्रे नगर परिषदेनं पूर्ण करायची होती. तर रुग्णवाहिका उत्पन्नातून २० टक्के न.प. व ८० टक्के सेवाभावी संस्थेस देण्याचे ठरले होते.

वर्षभरापूर्वी रुग्णवाहिकांचे रिपासिंग परिवहन खात्याकडील संपले होते. यानंतर सेवाभावी संस्थेने न.प.कडे पत्र व्यवहार केले, परंतु कुणीही लक्ष दिले नाही.

शेवटी पासिंगची मुदत संपल्यानंतर सेवा देणाऱ्या संस्थेने रुग्णवाहिकांचा ताबा न.प.कडे दिला. झालेल्या करारापुर्वी रुग्णवाहिका न.प.च्या ताब्यात आल्या आहेत.

सध्या त्या अग्निशमन केंद्र परिसरात ऊन, पाऊस अंगावर घेत आहेत. लाखोंच्या किंमतीच्या रुग्णवाहिका अक्षरशः धुळखात पडून आहेत.

रुग्णवाहिकेत आधुनिक तंत्रज्ञान विकसित साहित्य आहे. ते नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. हे वाहन सेवेशिवाय उभे असल्याने खराब होण्याची शक्यता अधिक आहे.