दापोलीत २६ केंद्रातून २४२७ विद्यार्थी आजमावणार आपले नसीब
दापोली : गेल्या वर्षापासून जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जि. प. च्या प्राथमिक शाळांमधील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे, स्पर्धात्मक वातावरण निर्मिती, संशोधनविषयक जिज्ञासूवृत्ती वाढविणार्या विद्यार्थ्यामधून भावी शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी निवडक प्रज्ञावान विद्याथ्यांना NASA अमेरीका ISRO, भारत या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थाना भेट घडवून आणणे ही एक महत्वाकाक्षी योजना राबविण्यात येत आहे. ही योजना फक्त जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जि.प.शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांपूर्तीच मर्यादीत आहे.
या करीता विद्यार्थ्यांची केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तर अशा विविध पातळींवर चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिली केंद्रस्तर परीक्षा ही सोम. दि.१६ नोहेंबर रोजी होत आहे.
यासाठी सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांना माहिती देवून विद्यार्थ्यांची परीक्षेची अवांतर तयारी करून घेण्यात आली असून, आज पहीली चाळणी परीक्षा होत आहे.
दापोली तालुक्यात २६ परिक्षा केंद्रातून २४२७ विद्यार्थी आज ही परीक्षा देत आहेत. याचे सुनियोजन दोनच दिवसापूर्वी पार पडलेल्या सहविचार सभेमध्ये केलेल आहे.
चालू वर्षी ISRO, भारत दौर्याकरीता जिल्ह्यातील ०४ शिक्षकांची यात २ महिला शिक्षक व २ पुरूष तर NASA अमेरिका दौर्याकरीता जिल्ह्यातील ०२ शिक्षकांची निवड यामध्ये १ महिला शिक्षक व एका पुरूष शिक्षकाचा समावेश केला जाणार आहे.
अंतिम निवड परीक्षेत गुणानुक्रमाने सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची निवड ही ISRO व NASA दौर्याकरीता करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सभेत सांगितले.
विशेष म्हणजे सदर परीक्षेसाठी
कोणत्याही प्रकारचे शुल्क (परीक्षा फी) आकारण्यात येत नाही.
जि.प.शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असल्याचेही बळवंतराव यावेळी म्हणाले.