दापोली : असोंड गावच्या तरूणावर साखळोली परिसरात बिबटयाने हल्ला केला. यामध्ये तो थोडक्यात बचावला असून बिबट्याच्या नखांमुळे तरूणाला जखमा झाल्या आहेत.
दापोली येथून असोंडला जात असताना रात्री सव्वाआठच्या दरम्यान ही घटना घडली. वैभव खेडेकर (वय 27 ) असे जखमी तरूणाचे नावे आहे.
वैभव खेडेकर हा तरूण 7 ऑक्टोबरला दापोलीकडून दुचाकीवर मित्रासह गावी येत असताना साखळोली नं. 1 या गावचे ओम तेलोबा मंदिर परिसरात बिबटयाने हल्ला केला.
दुचाकीवर मागे त्याचा मित्र अजय खेडेकर बसला होता. अजयच्या हातात मासळीची पिशवी होती. ओम तेलोबा मंदिर परिसरात आल्यावर रस्त्याशेजारी दबा धरून बसलेल्याय बिबटयाने दुचाकीवर उडी घेतली.
मासळीची पिशवी बिबटयाने ओढून नेली. यावेळी पंजा मारला तो वैभवच्या पायावर. त्यामुळे पायाला जखम झाली.
वैभवने बिबटयाच्या हल्ल्यात न डगमगता हातातील दुचाकी सोडली नाही, तर त्याने भरधाव वेगाने शिवाजीनगर येथील खासगी डॉक्टराकडे जाऊन उपचार करून घेतले.
ही घटना समजताच वनविभागाच्या वन अधिकारी प्रकाश पाटील यांनी वैभवची भेट घेउन विचारपूस केली त्याचप्रमाणे ज्या परिसरात घटना घडली त्या परिसरात गस्त चालू केली.
बिबटयापासून बचावासाठी परिसरात सूचना फलक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. संध्याकाळी पावणेसातच्या दरम्यान मंगेश घडवले (वय 35) याच्यावरही बिबटयाने याच परिसरात हल्ला केला. पण तो बचावला. त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेटखाली बिबटयाची नखे लागली आहेत.
गेल्यावर्षी याच रस्त्यावर 3 ते 4 जणांवर बिबट्याने हल्ला केला होता. गेले वर्षभर बिबट्या कोणालाही दिसला नाही. त्यामुळे तो या परिसरातून दुसरीकडे निघून गेल्याची चर्चा होती. मात्र आता परत बिबटयाने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.