जागतिक किर्तीचे शेती शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.

कृषि संशोधक असलेल्या एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म 19 ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडू राज्यातील तंजावर येथे झाला होता. कृषि क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांनी जगभरात सन्मान मिळवला होता.

गहू आणि तांदळाच्या जाती शोधल्या

१९४९ मध्ये बटाटा, गहू, तांदुळ आणि ताग यांच्या गुणसूत्रांवर संशोधनाने कारकिर्दीची सुरुवात केली होती. हरितक्रांती कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी अधिक उत्पन्न देणान्या गव्हाच्या आणि तांदळाच्या जाती शोधून काढल्या.

त्यांच्यामुळे सामान्य शेतकन्यांना फायदा झाला असून भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. स्वामीनाथन यांनी १९४३ मध्ये बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळ आणि देशातील अन्नधान्याच्या टंचाईचा अनुभव आल्यानंतर त्यांनी कृषि क्षेत्रात प्रवेश: करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्राणीशास्त्र, कृषिशास्त्र दोनही विषयात विज्ञान पदवी संपादन केली होती.

दुष्काळात बहुमोल कार्य केले

१९६० च्या दशकात देशात मोठया प्रमाणावर दुष्काळ पडणार होता. त्यावेळी स्वामीनाथन यांनी अमेरिकन संशोधन नॉर्मल बोरलॉग आणि अनेक वैज्ञानिकांच्या मदतीने गव्हाची जादा उत्पन्न देणारे (अधिक उत्पादन देणाच्या जाती) वाणांचा शोध लावला.

स्वामीनाथन यांनी भारतीय कृषि संशोधन परिषदेत १९७२ ते १९७९ पर्यंत तर आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत १९८२ ते १९८८ पर्यंत महासंचालक म्हणून काम केले. स्वामीनाथन यांची कारकिर्द

एम. एस. स्वामीनाथन यांनी १९६१ ते १९७२ या ११ वर्षाच्या काळात कृषि अनुसंधान परिषद दिल्लीचे संचालक म्हणून काम पाहिल.

१९७२ १९७९ या काळात ते भारतीय कृषि अनुसंधान परिषद दिल्लीचे महासंचालक आणि केंद्रीय कृषि विभागाचे सचिव म्हणून काम पहात होते. तद्नंतर त्यांची कृषि खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली.

१९८० ते ८२ या तीन वर्षात त्यांनी नियोजन आयोगाचे उपसंचालक आणि त्यांनतर सदस्य म्हणून कार्यभार संभाळला. १९८२ ते १९८८ या ७ वर्षात त्यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च फिलीपाईन्सचे इन्स्टिट्युटचे महासंचालक म्हणूनही काम केले.

पहिला जागतिक अन्न पुरस्कार

एम एस स्वामीनाथन यांचा १९८७ साली पहिल्या विश्व अन्न पुरस्कारने (World Food Prize) सन्मान करण्यात आला. यानंतर स्वामीनाथन यांनी चेन्नईमध्ये एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनचीही स्थापना केली.

एम. एस. स्वामीनाथन यांना पदमश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय एच. के. फिरोदिया पुरस्कार, लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार इंदिरा गांधी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त त्यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार (१९७१) व अॅल्बर्ट ऑईनस्टाईन वर्ल्ड सायन्स अॅवॉर्ड (१९८६) हे दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कारही मिळाले होते.

ज्याप्रमाणे जमिनीवर शेती केली जाते, त्याप्रमाणे पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या ७० टक्के पाण्यावर सुध्दा शेती करण्याची अभिनव कल्पना त्यांनी मांडली.

हरितक्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या बाबतीत भारत देशाला स्वयंपूर्ण करण्याचा या थोर कृषि शास्त्रज्ञांनी काळाची पावले ओळखली होती असे म्हणायला हरकत नाही.

अन्नसुरक्षेसोबतच सद्यस्थितीत देशातील जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने पौष्टीक गुणधर्मयुक्त अन्न मिळाले पाहिजे या दृष्टीकोनातून जागतिक बँक आणि एम. एस. स्वामीनाथन रिसर्च प्रतिष्ठानच्या माध्यमातून पौष्टीक गुणधर्मयुक्त पीकाच्या बागा तयार करण्याची संकल्पना मांडली.

या विद्यापीठाअंतर्गत कार्यरत कृषि विज्ञान केंद्रे रायगड व पालघर येथे राबविण्यात आलेल्या “राज्य आहार आणि जैव पोषण संयुक्त वनस्पतींची वंशावळ बाग शास्त्रीय पध्दतीने तयार करून ग्रामीण आदिवासी जनतेला कुपोषणमुक्त आयुष्य जगण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरले. अशा या थोर कृषि शास्त्रज्ञाला माझे विनम्र अभिवादन..

– डॉ. संजय भावे, कुलगुरु डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली

– Advt.