दापोली : कोकणामधील पडीक जमिन आणि आंबा, काजू बागांमधील लागवडीयोग्य जमिनीवर हळदीचे मोठया प्रमाणावर लागवड करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि मटकृषी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

विद्यापीठाचे प्रभारी संशोधन संचालक डॉ. सतिश नारखेडे आणि मटकृषी प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईच्या अधिकाऱ्यांनी सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक डॉ. राजेंद्र धोपावकर आणि प्रकल्प प्रमुख डॉ. अजय राणे उपस्थित होते.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली कृषी विद्यापीठ आणि खाजगी संस्थेमार्फत मोठया प्रमाणावर हळद पिकाची लागवड करण्यासाठी (पत्नीक प्रायव्हेट पार्टनरशिपव्दारे ) राबविण्यात येणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असून यामधून कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरती हळदीची मोठया प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर तयार झालेल्या हळदीवर प्रक्रिया करुन त्यामधील कुरकुमिन काढणे, हळदीपासून पावडर तयार करणे, त्याचे उत्तमप्रकारे पॅकेजींग करून विद्यापीठाचा एक स्वतंत्र निर्यातक्षम ब्रँड तयार करून विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

यासाठी वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रती दिन दोन टन हळदीवर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेचा कारखाना आणि हळदीची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यासाठी गोदामे बांधण्यात येणार आहेत.

हळदीमधील कुरकुमिनची गुणवत्तेची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा देखील उभारण्यात येणार आहे. यासाठी येणारा सर्व खर्चाचा भार मटकृषि प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.

येत्या पाच ते सात वर्षांमध्ये जवळजवळ ९ कोटी रुपयांची गुंतवणूक सदर कंपनी करणार असून विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना हळदीच्या शास्त्रशुद्ध लागवडीचे प्रशिक्षण देणे, उत्तम दर्जाचे हळदीचे बियाणे व रोपे पुरविणे आणि शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात हळद लागवडीसाठी उद्युक्त करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.

याकरीता यावर्षी विद्यापीठाने ५० एकर प्रक्षेत्रावर लागवड केली आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून तरुणांनी नोकरीसाठी शहरांकडे न जाता हळद पिकासारख्या शेतीकडे वळावे आणि कोकणातील शेतकऱ्यांनी हळदीची मोठया प्रमाणात लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी केले आहे.