सदानंद कदम यांच्या जामिनाचा फैसला लांबणीवर
मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जाचा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने सप्टेंबरमध्ये निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.
न्यायाधीश एम. जी. देशपांडे अन्य तातडीच्या प्रकरणांत व्यस्त असल्यामुळे निकालपत्र अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे न्यायालयाने सदानंद कदम यांच्यासह दापोलीतील माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर निर्णय देण्यासाठी सुनावणी 2 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.
साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात सदानंद कदम आणि जयराम देशपांडे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर सदानंद कदम यांनी ॲड. सचिन हांडे यांच्यामार्फत, तर जयराम देशपांडे यांनी
ॲड. सुबीर सरकार यांच्यामार्फत जामिनासाठी दाद मागितली आहे.
त्यांच्या अर्जांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विशेष पीएमएलए न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी २६ जून रोजी निर्णय राखून ठेवला होता.
हा निर्णय शुक्रवारी जाहीर केला जाण्याची शक्यता होती. तसे संकेतही न्यायालयाने दिले होते; मात्र निकालपत्र अद्याप पूर्ण न झाल्यामुळे न्यायाधीशांनी दोघांच्याही जामीन अर्जावरील निर्णयासाठीची तारीख २ सप्टेंबर रोजी निश्चित केली.
गेल्या दोन महिन्यांत न्यायालयाने सात वेळा तालखा पुढे ढकलल्या आहेत.