दापोली – शहरातील कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षामध्ये उद्योजकता विकास आणि व्यवसाय संवाद या विषयावरील शिक्षण घेणाऱ्या ६० विद्यार्थ्यासाठी कृषी पर्यटन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गव्हे येथील निसर्ग सहवास कृषि पर्यटन केंद्राचे आशिष अमृते यांनी मार्गदर्शन केलं.
यावेळी आशिष अमृते यांनी निसर्ग सहवास या त्यांच्या प्रकल्पाची ओळख विद्यार्थ्यांना दिली. निसर्ग सहवास कृषी पर्यटन केंद्रामध्ये असणाऱ्या विविध संधी आणि आव्हाने यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. समृध्दी राठोड हिनेही आपलं मनोगत व्यक्त केलं. इतर विद्यार्थ्यांनी कृषी पर्यटन व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर होण्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असायला हवा याबाबत प्रमुख वक्त्यांशी चर्चा केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख वक्ते आशिष अमृते यांचं स्वागत व सत्कार विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश कदम यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कोकोडेमा या आधुनिक रोपे तयार करण्याच्या पद्धतीमध्ये उद्योजक म्हणून पदार्पण करीत असलेली जान्हवी कारंडे हिचेही स्वागत व सत्कार डॉ. संतोष वरवडेकर यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी आजच्या दिवशी आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रमाविषयी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रविण झगडे यांनी केले. आभार प्रदर्शन स्नेहल बनकर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रेरणेने विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जगदीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष वरखडेकर, डॉ. हेमंत बोराटे, डॉ. आशिष शिगवण, डॉ. मंदार पुरी, डॉ. प्रविण झगडे, श्रियश पवार तसेच कनिष्ठ व वरिष्ठ पदव्युत्तर विशेष योगदान दिले.